पोषणासोबत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन; हनुमान नगर येथे पोषण मेळावा |

Share:

पोषण, आरोग्य, महिला हक्क आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती

पालघर, दि. २८ सप्टेंबर २०२६ : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघरअंतर्गत तारापूर-२ विभागात पोषण महाअभियानाच्या निमित्ताने पोषण मेळावा तसेच पंचायतराज संस्थांमधील महिलांसाठी कायदेविषयक प्रशिक्षणाचे आयोजन २३ सप्टेंबर रोजी हनुमान नगर ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले. महिलांचे पोषण, आरोग्य, कायदेविषयक अधिकार आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, माजी जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे, सरपंच गुलाब खरपडे आणि उपसरपंच यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

पोषण आणि कायदेविषयक अधिकारांवर मार्गदर्शन

यावेळी वैदेही वाढाण यांनी पोषण अभियानाच्या विविध संकल्पना आणि त्यामागील उद्देश स्पष्ट केला. महिलांनी तसेच किशोरवयीन मुला-मुलींनी पोषणाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन त्यांनी केले.

आदिवासी समाजासाठी असलेल्या विविध कायद्यांतील तरतुदी, मुला-मुलींचे शासनाने निर्धारित केलेले विवाहाचे वय तसेच त्यापूर्वी विवाह झाल्यास उद्भवू शकणाऱ्या शारीरिक परिणामांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. समाजातील रूढी-परंपरांचा विचार करताना मुला-मुलींचे आरोग्य आणि भवितव्य यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भावना विचारे यांनी अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांमधील बालकांना ‘चांगला स्पर्श’ आणि ‘वाईट स्पर्श’ याबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्याच्या गरजेवर भर दिला. पालक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बालकांना समजेल अशा पद्धतीने प्रत्यक्ष कृतीतून ही माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

मुला-मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, महिलांसाठी असलेले विविध कायदे तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील योजनांची अद्ययावत माहिती ठेवावी, असे आवाहनही करण्यात आले.

महिलांना कायदेविषयक हक्कांची माहिती

कार्यक्रमात वकिलांच्या माध्यमातून हुंडा प्रतिबंधक कायदा, वारसा हक्क, महिलांवरील हिंसाचार प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा (POSH Act), चाइल्ड हेल्पलाइन तसेच महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाइन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कायद्याने महिलांना दिलेले अधिकार, संरक्षणाच्या तरतुदी आणि अडचणीच्या प्रसंगी उपलब्ध असलेल्या कायदेशीर मदतीची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. यावेळी महिलांना कायदेविषयक पुस्तकांचेही वाटप करण्यात आले.

‘पहिले १००० दिवस’ आणि पोषणावर भर

पोषण मेळाव्यात बालकाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ‘पहिले १००० दिवस’ महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. बालक आणि मातांच्या आहारातील पोषणमूल्यांचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.

पर्यवेक्षिका रत्नमाला गायकवाड यांनी अॅनिमिया प्रतिबंध, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना तसेच किशोरवयीन मुला-मुलींनी नियमितपणे पोषणमूल्ययुक्त आहार घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

महिलांसाठी पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी निमिषा संखे, अॅड. अनिता गावित, मोनाली पाटील, ज्योती होळकर, दीपा महाले, पर्यवेक्षिका रत्नमाला गायकवाड यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *