वाणगाव : वाणगाव येथे भाजपला मोठा राजकीय धक्का बसला असून, भाजपचे सदस्य आणि वाणगाव ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य अक्षय धोडी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपला रामराम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश पालघर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि डहाणू तालुका काँग्रेस अध्यक्षा वर्षा वायडा यांच्या उपस्थितीत वाणगाव काँग्रेस कार्यालयात पार पडला.

राहुल गांधी आणि कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अक्षय धोडी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या गतिमान नेतृत्वासोबतच नव्याने नियुक्त जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यमभाई ठाकूर यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
युवा शक्ती काँग्रेसच्या विचारधारेकडे आकर्षित होत असल्याचा दावा
अक्षय धोडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करताना कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी या पक्षप्रवेशाचे स्वागत केले. ते म्हणाले, “अक्षयचा काँग्रेसमधील प्रवेश हा केवळ एका व्यक्तीचा पक्षप्रवेश नाही, तर युवा शक्ती काँग्रेसच्या विचारधारेकडे आकर्षित होत असल्याचे द्योतक आहे.”

अक्षय धोडी हे धाडसी आणि तरुण नेतृत्व असल्याचे सांगत कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी पुढे म्हटले की, सत्तेत असतानाही भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेणे हे त्यांच्या राजकीय धैर्याचे आणि विचारांवरील विश्वासाचे प्रतीक आहे.
सर्वसमावेशक राजकारण तरुणांना प्रेरणादायी
कॅप्टन सत्यम ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करताना सांगितले की, प्रगती, सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक राजकारणाचा विचार आजच्या तरुणांना प्रेरणा देत आहे.
दरम्यान, अक्षय धोडी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे काँग्रेस परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
कॅप्टन सत्यम ठाकूर
जिल्हाध्यक्ष, पालघर जिल्हा काँग्रेस
