सीताराम बाप्पा मार्केटमध्ये मध्यरात्री मीटर बॉक्सला आग; अग्निशमन दलाने १० ते १५ मिनिटांत आगीवर मिळवले नियंत्रण, जीवितहानी नाही
नालासोपारा : वसई-विरार शहरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. नालासोपारा येथील इम्पीरियल हेरिटेज इमारतीला लागलेल्या आगीची घटना नागरिक अद्याप विसरलेले नसतानाच आगीची आणखी एक घटना घडली आहे. मंगळवारी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास नालासोपारा पूर्वेकडील बाप्पा सीताराम मार्केट परिसरातील आकांक्षा टॉवरच्या सी-विंगमध्ये भीषण आग लागली. मात्र, वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मीटर बॉक्सला अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
मीटर बॉक्सला आग लागली, त्यावेळी वीजपुरवठा सुरू होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रहिवाशांनी महावितरणशी संपर्क साधला आणि वीजपुरवठा खंडित करून घेतला. वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन होज पाइपच्या साहाय्याने पाण्याचा मारा सुरू केला. सुमारे १० ते १५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.
सीताराम बाप्पा मार्केट परिसरात सामान्यतः नागरिक आणि प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, ही घटना मध्यरात्री घडल्याने संभाव्य मोठा अपघात टळला. असे असले तरी इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर बॉक्सची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली.
प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

