सफाळे, पालघर, बोईसर आणि डहाणू येथील हजारो दैनंदिन रेल्वे प्रवाशांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी
पालघर | प्रतिनिधी :
मध्य रेल्वेने काही सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या निर्णयामुळे संबंधित गाड्यांनी नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः मासिक सीझन तिकीटधारकांना तसेच नियमित तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा आहे.
याच धर्तीवर पश्चिम रेल्वेनेदेखील प्रवाशांच्या हिताचा विचार करून काही महत्त्वाच्या गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द करावा, अशी मागणी शिवसेना महाराष्ट्राचे प्रवक्ते केदार काळे यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.
केदार काळे यांनी आपल्या निवेदनाद्वारे खालील पाच गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द करण्याची मागणी केली आहे.
- फ्लाईंग राणी – १२९२१ / १२९२२
- इंटरसिटी एक्स्प्रेस – १२९३५
- लोकशक्ती एक्स्प्रेस – २२९२७ / २२९२८
- सौराष्ट्र मेल – २२९४५ / २२९४६
- गुजरात मेल – १२९०१ / १२९०२
सफाळे, पालघर, बोईसर आणि डहाणू परिसरातून मुंबईच्या दिशेने दररोज हजारो प्रवासी नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर कामांसाठी रेल्वेने प्रवास करतात. या प्रवाशांमध्ये मासिक सीझन तिकीटधारकांची संख्या मोठी आहे. सुपरफास्ट दर्जामुळे तिकीट दरात पडणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी झाल्यास नियमित प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या हितासाठी असा निर्णय घेतला असेल, तर पश्चिम रेल्वेनेही याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना आर्थिक दिलासा द्यावा, असे केदार काळे यांनी म्हटले आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून संबंधित गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द करण्याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी केदार काळे यांनी केली आहे.
– केदार काळे
प्रवक्ते, शिवसेना महाराष्ट्र

