लोकसहभागातून जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम!

Share:

आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांच्या श्रमदानातून वडपाडा येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी

जव्हार : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० अंतर्गत पंचायत समिती जव्हारच्या कार्यक्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व संगणक परिचालकांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायत रायतळे हद्दीतील वडपाडा येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी केली.

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरविणे, भूजल पातळीत वाढ करणे तसेच उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करणे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

वनराई बंधाऱ्याच्या उभारणीत श्रमदान करताना सर्व संगणक परिचालकांना विशेष आनंद आणि समाधान मिळाले. श्रमदानातून अडविलेले पाणी पुढील दोन ते तीन महिने गावातील नागरिकांसह परिसरातील पशुधन आणि गुरांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पाण्याची बचत होऊन त्याचा योग्य वापर करता येणार असल्याचे समाधान प्रत्येक श्रमदात्याच्या चेहऱ्यावर दिसून आले.

केवळ शासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता सामाजिक विकासातही आपले योगदान देता येते, याचा आदर्श आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनी या उपक्रमातून घालून दिला आहे.

जलसंधारणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

पाणी हीच खरी संपत्ती असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिक, युवक, महिला मंडळे आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.

पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा आणि दुष्काळावर मात करा!

लोकसहभागातून जलसंधारण, श्रमदानातून ग्रामसमृद्धी आणि पाणी बचतीतून समृद्ध भविष्य, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *