डहाणू समुद्रकिनाऱ्यावर १६ मीटर लांबीची मृत व्हेल आढळली; वनविभागाकडून नमुने घेऊन मृतदेह पुरला |

Share:

सुमारे २० टन वजनाच्या नर व्हेलचे वय २५ वर्षे असल्याचा अंदाज; शवविच्छेदन आणि तपासणी अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू समुद्रकिनाऱ्यावर रविवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास १६ मीटर लांबीची एक विशालकाय व्हेल मृतावस्थेत आढळली. डहाणू वनविभागाच्या कॅनाड परिमंडळांतर्गत सरावली नियतक्षेत्रातील चिखला खाडी पुलाजवळ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ही व्हेल आढळून आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आवश्यक नमुने गोळा केल्यानंतर रात्री सुमारे ८.३० वाजता समुद्रकिनाऱ्यालगत खड्डा खोदून व्हेलचा मृतदेह पुरण्यात आला.

वनविभागाच्या माहितीनुसार, मृत व्हेल नर जातीची होती. तिचे अंदाजे वय २५ वर्षे आणि वजन सुमारे २० टन असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हेल पाठीवर पडलेल्या अवस्थेत आढळली. प्राथमिक अंदाजानुसार, रात्री समुद्रात आलेल्या उंच लाटा आणि भरतीच्या पाण्याच्या प्रवाहासोबत तिचा मृतदेह वाहून किनाऱ्यावर आला असावा. मात्र, तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

घटनास्थळी डहाणूचे वनक्षेत्रपाल नवीन माछी, कॅनाडचे वनपाल तिलक स्वामी यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस विभाग, तटरक्षक दल, कांदळवन विभाग, टीटीसी रेस्क्यू टीम, डब्ल्यूसीएडब्ल्यूए, वन्यजीवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले.

समुद्राच्या भरतीचे पाणी व्हेलच्या मृतदेहाभोवती असल्याने ओहोटी होईपर्यंत मृतदेह पुरण्याची प्रक्रिया थांबवावी लागली. सायंकाळी ५ वाजल्यानंतर जेसीबी मशीनच्या मदतीने खोल खड्डा खोदण्याचे काम सुरू करण्यात आले. रात्री सुमारे ८.३० वाजता खड्डा तयार झाल्यानंतर व्हेलचा मृतदेह त्यात पुरून मातीने झाकण्यात आला.

वनविभागाचे नागरिकांना आवाहन

समुद्रकिनाऱ्यावर कोणताही मृत किंवा जखमी समुद्री जीव आढळल्यास त्याला स्पर्श करू नये किंवा त्याच्याशी छेडछाड करू नये, असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे. अशा घटनेची माहिती तातडीने वनविभागाच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १९२६ वर द्यावी, जेणेकरून वेळेत आवश्यक कार्यवाही करता येईल.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *