अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ आणि भटकी भूत संस्थेच्या पुढाकारातून खरोंडा पाड्यावर ‘आनंदाची दिवाळी’चा प्रकाश!

Share:

जिल्हा परिषद शाळा खरोंडा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याची भेट; पाच अनाथ विद्यार्थ्यांना कपडे आणि शैक्षणिक साहित्य देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन

जव्हार (प्रतिनिधी) : दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण! याच सणाचे औचित्य साधून भटकी भूत गिर्यारोहण संस्था, अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ, हारजीत क्रीडा मंडळ आणि Your Belief Foundation यांच्या संयुक्त पुढाकारातून जिल्हा परिषद शाळा खरोंडा, तालुका जव्हार येथे ‘आनंदाची दिवाळी’ हा अनोखा आणि प्रेरणादायी सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी आयोजित या उपक्रमांतर्गत शाळेला क्रीडा साहित्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, तसेच शाळेतील पाच अनाथ विद्यार्थ्यांना विशेष स्वरूपात कपडे आणि शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. समाजातील वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाला भटकी भूत गिर्यारोहण संस्था आणि अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघाचे अध्यक्ष राजाराम गीते, राकेश मोरे, सुशांत कदम, दर्शन तिर्लोटकर, अमोल तिर्लोटकर, प्रतीक तिर्लोटकर, अमित बाफार्डेकर, सूरज म्हात्रे, राजू धुवाळी, योगेश चव्हाण, अमित चव्हाण, सिद्धेश वळवळकर, तेजस यादव, संदेश इंदूवळकर आणि योगेश सावंत उपस्थित होते.

तसेच Your Belief Foundation चे अध्यक्ष योगेश पाते, रोहन भोसले, कुणाल भोसले, धनेश राणे, निलेश गावडे, हारजीत क्रीडा मंडळाचे प्रमोद राडये, राजेंद्र परब, सचिन भाटकर आणि वसुंधा लाड यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सुंदर आयोजन जिल्हा परिषद शाळा खरोंडा येथील मुख्याध्यापक दशरथ तुंबडा, सहशिक्षक सुभाष टोपले, सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश हांडवा आणि ग्रामपंचायत सदस्य चिंतु दळवी यांच्या सहकार्याने करण्यात आले.

या वेळी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पारंपरिक तारपा नृत्य विशेष आकर्षण ठरले. तारपा वादक गुलाब हांडवा आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने बहारदार तारपा वादन व नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पारंपरिक आदिवासी संस्कृती, लोककला आणि उत्साहाच्या वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली.

पाच अनाथ विद्यार्थ्यांसाठी माणुसकीचा विशेष हात

या उपक्रमातील सर्वांत भावनिक आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शाळेतील पाच अनाथ विद्यार्थ्यांना कपडे आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. तसेच शाळेच्या शैक्षणिक आणि क्रीडा विकासासाठी आवश्यक साहित्यही भेट देण्यात आले.

केवळ भेटवस्तूंचे वाटप न करता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

दिवाळीच्या निमित्ताने आदिवासी पाड्यावरील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे करणे, त्यांच्या गरजा जाणून घेणे आणि त्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणे, हा खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श आहे.

आजच्या काळात सण-उत्सव केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटून घेण्याची गरज आहे. या उपक्रमातून विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.

अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ आणि भटकी भूत, बोरिवली पूर्व, मुंबई संस्थेचे अध्यक्ष राजाराम गीते यांनी या उपक्रमासाठी मदत करणारे सर्व देणगीदार, संस्थेचे पदाधिकारी, उपस्थित सदस्य, ग्रामस्थ, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे आभार व्यक्त केले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, पारंपरिक तारपा नृत्याचा उत्साह आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने खरोंडा येथील आदिवासी पाड्यावर यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची, माणुसकीची आणि सामाजिक एकतेची ठरली!

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *