वाचनसंस्कृतीला प्रोत्साहनासोबत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
पालघर, प्रतिनिधी – : पालघर तालुक्यातील कुडण येथे उत्कृष्ट तरुण मंडळाच्या वतीने बाल वाचनालय कुडणच्या ८२व्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देतानाच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सामाजिक सहभागाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थ, विद्यार्थी आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा टाटा स्टीलचे सीनियर लॅब असिस्टंट मकरंद अशोक पाटील होते. प्रमुख पाहुण्या म्हणून पालघर-केळवे येथील पदवीधर शिक्षिका तथा जिल्हा परिषद शाळा, विरार-फुलपाडा येथील अम्रिता विकास सावे उपस्थित होत्या.
अम्रिता सावे यांनी यापूर्वी कुडण जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून काम केले असल्याने गावाशी असलेल्या त्यांच्या जुन्या ऋणानुबंधामुळे त्यांच्या उपस्थितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियोजन
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष सुशील किशोर चुरी, उपाध्यक्ष आशिष भालचंद्र म्हात्रे, सचिव रुपेश रमेश पाटील, सहसचिव दर्शन हरेश्वर म्हात्रे आणि खजिनदार भालचंद्र नारायण म्हात्रे यांनी नियोजन केले.
उत्सव समितीच्या माध्यमातून संतोष सदाशिव म्हात्रे, ज्युलेश सतिश राऊत, माधवी भालचंद्र म्हात्रे, हेमांगी हरेश्वर म्हात्रे, प्रेरणा महेंद्र म्हात्रे, शितल शिरीष म्हात्रे, पुनम मकरंद पाटील, विद्याधर भालचंद्र पाटील, प्रणाली ह. राऊत, विजया रा. म्हात्रे, अशोक मोरेश्वर पाटील, अजय चंद्रकांत किणी आणि यतिन सदानंद म्हात्रे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ
गणेशमूर्ती स्थापना, बक्षीस वितरण समारंभ तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी उत्सवाला रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे वाचन, शिक्षण आणि संस्कारांना चालना देण्याचा बाल वाचनालयाचा उद्देश अधोरेखित झाला.
कुडण परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले. सामाजिक एकोपा, वाचनसंस्कृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा हा गणेशोत्सव परिसरातील नागरिकांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला.
‘मानाच्या खुर्चीपेक्षा तळागाळात काम करण्याला प्राधान्य’
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अम्रिता विकास सावे यांनी आपल्या मनोगतात तळागाळातील सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
मानाची पदे मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कार्य करण्याला अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगत गाव, शाळा आणि संस्कृतीशी असलेले नाते पुढील पिढीनेही जपावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी यांसारखे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावेत. गावात नवीन शाळेची इमारत उभारून इंग्रजी माध्यमाची सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
तरुणांनी मोबाईलच्या आभासी दुनियेत अडकून न राहता सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. पालक आणि मुलांमध्ये मैत्रीपूर्ण संवाद वाढावा तसेच चांगली संगत, संस्कार आणि व्यसनमुक्त जीवनातून निरोगी समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
मुलांना गावाची माती, संस्कृती आणि निसर्गाची ओळख करून देणे ही काळाची गरज असल्याचेही सावे यांनी नमूद केले.
‘उत्सवाची परंपरा १०० व्या महोत्सवापर्यंत नेऊया’
कार्यक्रमाचे अध्यक्ष मकरंद अशोक पाटील यांनी आपल्या मनोगतात या गणेशोत्सवाची दीर्घ परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले.
“ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेत आज कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिळणे हे माझे भाग्य आहे. आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या या उत्सवाची परंपरा पुढे नेण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी कृतज्ञ आहे,” असे त्यांनी सांगितले.
हा उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता युवकांना एकत्र आणणारा आणि सामाजिक बांधिलकी मजबूत करणारा ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तरुण पिढीने पुढाकार घेऊन हा उत्सव भविष्यात १०० वा महोत्सव म्हणून साजरा करण्याचे ध्येय ठेवावे. युवकांनी वर्षभर सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
उत्सवाची परंपरा, सामाजिक एकोपा आणि गावाशी असलेली नाळ पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तरुणांनी स्वीकारावी, असे मकरंद पाटील यांनी सांगितले.

