जव्हारच्या पाणीटंचाईवर शाश्वत उपाययोजनांसाठी समन्वय बैठक |

Share:

आमदार हरिश्चंद्र भोये यांचा सहभाग; गावनिहाय जलस्रोत, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणावर चर्चा

जव्हार प्रतिनिधी :

जव्हार : तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांना उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीसमस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गुरुवारी पंचायत समिती जव्हार येथे समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. जलसंधारण आणि शाश्वत जलव्यवस्थापनावर केंद्रित या बैठकीला विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिश्चंद्र भोये उपस्थित होते.

बैठकीत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत गावनिहाय पाणीसमस्यांचा आढावा घेण्यात आला.

दहा गावांतील पाणीसमस्यांवर चर्चा

प्रगती प्रतिष्ठानच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जव्हार तालुक्यातील जुनी जव्हार, कासटवाडी, रायतळे, वाळवंडे, कौलाळे, धानोशी, पाथर्डी, न्याहाळे खुर्द, सारसून आणि आपटाळे या गावांतील पाणीटंचाई, उपलब्ध जलस्रोत आणि भविष्यातील जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

जव्हार तालुक्याची भौगोलिक परिस्थिती आणि पावसाचे असमान वितरण यामुळे काही गाव-पाड्यांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शेतीसाठीही पाण्याची आवश्यकता असल्याने केवळ तात्पुरता पाणीपुरवठा करण्याऐवजी गावनिहाय जलस्रोतांचे नियोजन, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणावर भर देण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.

विहिरी, शेततळी आणि बंधाऱ्यांवर भर

बैठकीत पाणीटंचाईग्रस्त गावांची सद्यस्थिती, गावनिहाय पाणी उपलब्धता, विद्यमान जलस्रोतांचे मूल्यांकन, विहिरींचे पुनर्भरण, नवीन विहिरींची आवश्यकता, शेततळी, छोटे बंधारे आणि भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आमदार हरिश्चंद्र भोये यांनी उपस्थित सरपंच आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून ग्रामपातळीवरील पाणीसमस्या जाणून घेतल्या. स्थानिक परिस्थिती आणि ग्रामपंचायतींच्या मागण्यांचा विचार करून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

विविध विभागांच्या समन्वयातून शाश्वत जलव्यवस्थापन

प्रगती प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र चंपानेकर यांच्या प्रस्तावित उपक्रमातून ही बैठक आयोजित करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यांच्या समन्वयातून पाणीटंचाईवर शाश्वत उपाययोजना करण्याच्या दिशेने पुढील कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

यावेळी गटविकास अधिकारी अक्षय पगार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सीताराम गावंढा, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी तसेच गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गावनिहाय जलस्रोतांचे नियोजन, जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधून जव्हार तालुक्याच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी पुढील कार्यवाहीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *