कुष्ठरोग निर्मूलनासाठी पालघरची आरोग्य यंत्रणा सज्ज; घराघरांत होणार तपासणी |

Share:

२८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम; संशयित रुग्णांचे लवकर निदान व त्वरित उपचारावर भर

पालघर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात २८ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम (LCDC) राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने २४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

घरभेटी देऊन नागरिकांची तपासणी

कुष्ठरोगाचे लवकर निदान, त्वरित उपचार आणि रोगाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात आरोग्य विभागाची क्षेत्रीय पथके घरभेटी देऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत.

त्वचेवर संवेदना कमी झालेला किंवा त्वचेच्या रंगात बदल झालेला डाग, मुंग्या येणे अथवा संबंधित भागातील संवेदना कमी होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास आवश्यक तपासणी केली जाणार आहे. संशयित रुग्णांना पुढील निदान आणि उपचारासाठी संबंधित आरोग्य संस्थांशी जोडण्यात येणार आहे.

मोहिमेच्या सूक्ष्म नियोजनाचा आढावा

आढावा बैठकीत मोहिमेच्या सूक्ष्म नियोजनासह क्षेत्रीय पथकांची कार्यवाही, घरभेटी, संशयित रुग्णांचा शोध, संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण, रुग्णांची नोंदणी, संदर्भ सेवा, उपचार व्यवस्था आणि अहवाल सादरीकरण यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या.

लवकर निदान आणि उपचार महत्त्वाचे

कुष्ठरोगाचे वेळीच निदान होऊन उपचार सुरू झाल्यास रोगामुळे होणाऱ्या शारीरिक गुंतागुंती टाळण्यास तसेच रोगाचा पुढील प्रसार रोखण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज आणि कलंक दूर करून आरोग्य विभागाच्या पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी तसेच सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), पालघर डॉ. अशोक गवळी यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

“लक्षणे लपवू नका; तातडीने तपासणी करून घ्या”

“कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपवू नका; तातडीने तपासणी करून घ्या. कुष्ठरोगमुक्त पालघरसाठी नागरिकांनी आरोग्य विभागाच्या पथकांना सहकार्य करावे,” असे आवाहन सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), पालघर डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *