घराची भिंत फोडून पालघर अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका
पालघर जिल्हा प्रतिनिधी :
पालघर : भिमाई नगर, नवली येथे मध्यरात्रीच्या सुमारास दोन घरांच्या भिंतींमधील अवघ्या एक फूटापेक्षाही कमी अरुंद जागेत ७० वर्षीय व्यक्ती अडकल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पालघर अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अत्यंत अरुंद जागेत अडकले वृद्ध
घटनास्थळी पाहणी केली असता विनोद विष्णू जाधव (वय ७० वर्षे) हे दोन घरांच्या भिंतींमधील अत्यंत अरुंद जागेत अडकलेल्या अवस्थेत आढळून आले. जागा अतिशय कमी असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना थेट त्या ठिकाणी प्रवेश करून त्यांची सुटका करणे शक्य होत नव्हते.
भिंत फोडून तयार केला सुरक्षित मार्ग
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने नियोजनपूर्वक बचावकार्य सुरू केले. जाधव यांच्या घराची आवश्यक ठिकाणी भिंत फोडून त्यांच्या सुटकेसाठी सुरक्षित मार्ग तयार करण्यात आला.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत विनोद जाधव यांना त्या अरुंद जागेतून सुखरूप बाहेर काढले.
पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल
रेस्क्यू केल्यानंतर विनोद जाधव यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय, पालघर येथे नेण्यात आले.
या बचावकार्यात लिडिंग फायरमन रुचित दवणे, यंत्रचालक निलेश पाटील, फायरमन संकेत पाटील, रुपेश पामाळे आणि मोहनिष पागधरे यांनी सहभाग घेतला. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे अरुंद जागेत अडकलेल्या ७० वर्षीय वृद्धाची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

