किनिस्ते येथे पद्मश्री भिकल्या धिंडा सभागृहाचे उद्घाटन; सूर्यमाळ आणि जव्हारला भेट देत विकासकामांचा घेतला आढावा
मोखाडा/जव्हार, पालघर |
ग्रामीण भागाच्या विकासासाठी मूलभूत सुविधा, स्थानिक रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि पर्यटन विकासाला प्राधान्य देऊन शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिले.
रानडे यांनी १३ ऑक्टोबर रोजी मोखाडा तालुक्यातील किनिस्ते येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. स्पार्क फाउंडेशन आणि किनिस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. या सभामंडपाला ‘पद्मश्री भिकल्या धिंडा सभागृह’ असे नाव देण्यात आले असून, आदिवासी तारपा वादक पद्मश्री भिकल्या धिंडा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाला स्पार्क फाउंडेशनचे संचालक मकरंद दीक्षित, किनिस्तेचे सरपंच योगेश दाते, उपसरपंच पंकज शिंदे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सूर्यमाळ ग्रामपंचायतीतील विकासकामांचा आढावा
उद्घाटनानंतर मनोज रानडे यांनी सूर्यमाळ ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामे आणि शासकीय योजनांचा आढावा घेतला. यावेळी आपले सरकार सेवा केंद्र, मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेचा प्रस्ताव, विहिरीशी संबंधित पाणीसमस्या आणि जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीची पाइपलाइन जोडण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
यावेळी रानडे यांच्या हस्ते नवीन घरकुलाचे उद्घाटन करण्यात आले आणि लाभार्थ्याला घराची चावी सुपूर्द करण्यात आली. तसेच अंगणवाडीला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी करण्यात आली.
महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीवर भर
सूर्यमाळ परिसरातील महसुली गावे एकमेकांपासून दूर असल्याने प्रत्येक गावात महिला बचत गट स्थापन करून स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असे निर्देश रानडे यांनी दिले.
जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता व्हीबी-जी राम जी (VB-G RAM G) योजनेअंतर्गत मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
जव्हारच्या पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी
यानंतर जव्हार पंचायत समिती येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा जव्हार प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत आकांक्षित तालुका विकास आराखड्याचा आढावा घेण्यात आला.
जव्हार परिसरातील पर्यटन विकासाच्या संधींचा प्रभावी उपयोग करून स्थानिक नागरिकांना रोजगार आणि उपजीविकेची साधने उपलब्ध करून द्यावीत, असे मार्गदर्शन रानडे यांनी केले. विकासकामांचे नियोजन करताना स्थानिक गरजा, उपलब्ध संसाधने आणि नागरिकांची आर्थिक प्रगती यांचा विचार करून सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
या दौऱ्यावेळी माजी सभापती प्रदीप वाघ, मोखाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जव्हार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांत कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, महिला सक्षमीकरणाला चालना देणे, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक विकास साधणे, या उद्दिष्टांवर या दौऱ्यात भर देण्यात आला.

