मुंबईत जंगलराज; लोकप्रतिनिधी आणि सेलिब्रिटीही असुरक्षित, कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली : खासदार वर्षा गायकवाड |

Share:

मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्त देवन भारती यांच्याशी भेट; वाढत्या गुन्हेगारीसह विविध मुद्द्यांवर चर्चा करून निवेदन सादर

मुंबई : मुंबई पोलिसांचा पूर्वीसारखा दरारा आता राहिलेला नाही. शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, ढासळती कायदा-सुव्यवस्था चिंतेचा विषय बनली आहे. लोकप्रतिनिधी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांचीही सुरक्षा धोक्यात असेल, तर सर्वसामान्य मुंबईकरांची काळजी कोण घेणार? जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत जंगलराज निर्माण झाले असून, राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री नसल्यामुळे कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, अशी टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.

खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पोलीस आयुक्त देवन भारती यांची भेट घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदनही सादर करण्यात आले.

या शिष्टमंडळात माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार ज्योती गायकवाड, राजेश शर्मा, चरणसिंग सप्रा, सुरेशचंद्र राजहंस, अखिलेश यादव, वीरेंद्र चौधरी, ट्युलिप मिरांडा आदींचा समावेश होता.

वाढत्या गुन्हेगारीवरून मुंबई काँग्रेसची चिंता

चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेला हल्ला ही गंभीर घटना असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यापूर्वी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, चित्रपट निर्माते रोहित शेट्टी आणि अभिनेता सलमान खान यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला, तसेच ठाण्यात एका पक्ष पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली, अशा घटनांचा उल्लेख त्यांनी केला.

महिलांवरील अत्याचार, वाढते गुन्हे आणि आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरण यांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित

काँग्रेस कार्यालयात प्रवेश करून पोलिसांनी आदिवासी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा आणि त्यांच्याशी मारहाण केल्याचा मुद्दाही शिष्टमंडळाने उपस्थित केला.

मुंबई पोलिसांची गौरवशाली परंपरा राहिली आहे. मात्र, पोलिसांचा पूर्वीसारखा दरारा आता दिसत नाही आणि गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे, ही चिंतेची बाब आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता पूर्वीसारखी कायम राहिली पाहिजे, असे खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले.

साहिल वाकोडे प्रकरणाच्या तपासानंतर कारवाईचे आश्वासन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) आणि गुन्हे शाखेकडून सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त देवन भारती यांनी दिल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

तसेच, काँग्रेस कार्यालयात प्रवेश करून आदिवासी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याच्या आरोपासंदर्भात पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले असून, पुरावे मिळाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही पोलीस आयुक्तांनी दिल्याचे खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *