‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानांतर्गत रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांच्या स्वच्छतेवर भर; पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे नागरिकांना आवाहन
भाईंदर : दिवाळी सणापूर्वी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तयारीला वेग दिला आहे. सणाच्या काळात रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि निवासी परिसरांमध्ये कचरा साचू नये, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सोमवारी ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
दिवाळीदरम्यान फटाके आणि इतर उत्सवी उपक्रमांमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच विविध भागांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवण्यावर भर
बैठकीत नागरिकांनी ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करावा, प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. याशिवाय फटाक्यांमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देशही देण्यात आले.
महानगरपालिका प्रशासनाने हे अभियान प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
दिवाळीच्या काळात शहरातील स्वच्छता व्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा मानला जात आहे.

