पालघर, मनोर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील जव्हार फाटा परिसरातील सावरखंड गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पालघर पथकाने कारवाई करत दमण बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला. बुधवारी (दि. २८) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पिकअप टेम्पोसह सुमारे साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाहनचालक मनोज त्रिपाठी याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कुरिअर पार्सलच्या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या
महामार्गावरून जाणाऱ्या संशयित पिकअप टेम्पोची तपासणी केली असता, कुरिअर पार्सलसाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकिंग बॉक्समध्ये दमण बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या या दारूची वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पालघर येथील पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंतदेसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलीस हवालदार संदीप सरदार, पोलीस शिपाई वैभव जामदार, पोलीस शिपाई विशाल कडव, पोलीस शिपाई बजरंग अमानवाड आणि पोलीस शिपाई राहुल क्षत्रिय यांचा समावेश होता.
जप्त करण्यात आलेला दारूसाठा कुठून आणण्यात आला होता आणि तो कुठे नेण्यात येत होता, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

