दोन किराणा दुकानांवर छापे; ३.५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
मनोर (वार्ताहर) : मनोर बाजारपेठेतील दोन किराणा दुकानांवर मनोर पोलिसांनी एकाच दिवशी छापे टाकून अवैध दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या गुळाचा आणि नवसागराचा मोठा साठा जप्त केला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३ लाख ५३ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन दुकानदारांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ च्या कलम ६५ (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास मनोर पोलिसांनी ही कारवाई केली. पहिल्या कारवाईत आशिष प्रकाश जैन यांच्या ललित किराणा दुकानासह गोडाऊनमधून काळ्या गुळाच्या १३६ गोण्या, काळ्या गुळाच्या आणखी १८ गोण्या आणि नवसागराच्या ६५० वड्या असा एकूण २ लाख ४६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत नितीन मंगीलाल जैन यांच्या किराणा दुकानातून काळ्या गुळाच्या ५७ गोण्या तसेच नवसागराच्या वड्यांचे बॉक्स असा १ लाख ७ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या दोन्ही प्रकरणांमध्ये मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ आणि २२७/२०२६ असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी लाड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास मनोर पोलीस करीत आहेत.
मनोर परिसरात अवैध दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

