वरई फाटा उड्डाणपुलाजवळ दोन वाहनांची भीषण धडक; सीएनजी वाहनाला आग!

Share:

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

मनोर (६ नोव्हेंबर) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरई फाटा उड्डाणपुलाजवळ गुजरात वाहिनीवर दोन वाहनांची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर एका सीएनजी वाहनाने अचानक पेट घेतल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग अधिक पसरण्याचा धोका टळला.

या अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी, महामार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.

महामार्ग पोलीस विभाग आणि मनोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) रत्नदीप साळोखे यांनी घटनास्थळी परिस्थिती हाताळत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. पोलिसांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे काही वेळानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले.

अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *