मनरे फाऊंडेशनच्या शैक्षणिक साहित्य वाटपाने २ हजार विद्यार्थ्यांची दिवाळी गोड!

Share:

पालघर तालुक्यातील ५० जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य किटचे वाटप

मनोर (वार्ताहर – ) : ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मनरे फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी नागझरी परिसरातील रोहिणी बँक्वेट येथे भव्य शैक्षणिक साहित्य वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पालघर तालुक्यातील ५० जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे २ हजार होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि आवश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी, आवश्यक शैक्षणिक साहित्याअभावी त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

मनरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले.

अचानक मिळालेल्या या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विशेषतः आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्य खरेदी करणे कठीण असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मोठा आधार मिळाला आहे.

या सोहळ्याला पंचायत समिती पालघरचे गटशिक्षणाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि मनरे फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेल्या मनरे फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे शैक्षणिक क्षेत्रातून तसेच पालकवर्गातून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *