३० ऑक्टोबर रोजी वरोर येथे मोर्चाचे आयोजन; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियोजित पालघर दौऱ्याच्या व्यवस्थापनावरही चर्चा
पालघर, बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ : वाढवण बंदरासह पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांविरोधात जनतेचा आवाज मांडण्यासाठी शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता वरोर येथे ‘पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी जनआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी बुधवारी सकाळी १०.३० वाजता पालघर येथील काँग्रेस भवनात जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम भाई ठाकूर होते.

मोर्चाच्या पूर्वतयारीवर चर्चा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर हे संबंधित संघर्ष समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. जनआक्रोश मोर्चाच्या पूर्वतयारीसह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियोजित पालघर जिल्हा दौऱ्याच्या नियोजन आणि व्यवस्थापनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाचे नियोजन
या बैठकीत जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व सदस्य, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध विभाग आणि सेलचे अध्यक्ष तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहभागाबाबत नियोजन करण्यात आले.
जनआक्रोश सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जिल्ह्याच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर आपली भूमिका मांडावी, यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढा व्यापक करण्याचा निर्धार
“एकच जिद्द, वाढवणसह सर्व विनाशकारी प्रकल्प रद्द!” या घोषवाक्याखाली पालघर जिल्ह्यातील जनतेच्या हक्कांसाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा लढा व्यापक करण्याचा संकल्प बैठकीत व्यक्त करण्यात आला.
जमीन, समुद्र, पर्यावरण आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याच्या रक्षणासाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.
संपर्क / प्रसिद्धी :
स्वप्नील पाटील
ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
कार्यालय : कॅप्टन सत्यम ठाकूर

