तारापूर एमआयडीसीतील गिनी सिल्क मिलला भीषण आग; अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण |

Share:

अनधिकृत अतिक्रमणांमुळे अग्निशमन दलाच्या मार्गात अडथळे; एमआयडीसी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पालघर / मनोर : तारापूर एमआयडीसीमधील गिनी सिल्क मिल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने रविवार असल्याने कंपनी बंद होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

या घटनेमुळे तारापूर एमआयडीसीतील अनधिकृत अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक परिसरात अनेक ठिकाणी प्लास्टिकचे शेड, अनधिकृत बांधकामे आणि नियमबाह्य अतिक्रमणांमुळे अंतर्गत रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे आग लागल्यास अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी येत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही ठिकाणी तर गेटबाहेरूनच आग विझवण्याची वेळ अग्निशमन दलाच्या जवानांवर येत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. औद्योगिक वसाहतीत हजारो कामगार काम करत असताना अग्निसुरक्षेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष धोकादायक ठरू शकते.

अतिक्रमणांमुळे अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अतिक्रमणांना जबाबदार कोण? एमआयडीसी प्रशासन अनधिकृत बांधकामांवर कारवाई का करत नाही? भविष्यात मोठी दुर्घटना घडून कामगारांचे जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असे सवाल उपस्थित होत आहेत.

एमआयडीसी प्रशासनाने तातडीने अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून अनधिकृत बांधकामे हटवावीत आणि अग्निशमन दलासाठीचे रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी होत आहे.

उद्योगांचा विकास जरूर व्हावा; मात्र अग्निशमन दलाचा मार्ग अडवून कामगारांच्या जीवाशी खेळ होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *