वसई-विरारमध्ये प्रदूषणावर देखरेखीचा मोठा प्रश्न; सर्वाधिक प्रभावित भागांत AQI मोजण्याची व्यवस्थाच नाही!

Share:

४० ते ४५ RMC प्लांटमधून धूळ पसरत असल्याचा आरोप; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईत ४ प्लांटची वीज खंडित, ९ प्लांटला नोटीस

वसई : वसई-विरारमध्ये वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी देखरेख व्यवस्थेच्या मर्यादाही समोर येऊ लागल्या आहेत. शहरातील ज्या भागांमध्ये औद्योगिक हालचाली, बांधकामे, रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांट आणि कचराभूमीमुळे प्रदूषणाचा धोका अधिक आहे, त्या ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रदूषणाच्या वास्तविक स्थितीचा अंदाज घेणे कठीण होत आहे.

शहरात सुरू असलेली बांधकामे, उघड्यावरून केली जाणारी मलब्याची वाहतूक, औद्योगिक आस्थापनांमधून बाहेर पडणारा धूर, वाहनांची वाढती संख्या आणि कचराभूमीला लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ससूनवघर, मालजीपाडा आणि जुचंद्र येथील RMC प्लांट तसेच अवजड वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर कचराभूमीतून निघणारा धूर भोयदापाडा, सातिवली, वालीव, राजावली आणि गोखीवरेपर्यंत पोहोचत आहे.

केवळ दोन ठिकाणी सक्रिय निरीक्षण केंद्रे

सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे विरार बोळींज आणि दिवाणमान येथे कार्यरत आहेत. महानगरपालिका मुख्यालय, तामतलाव आणि वसई पूर्वेकडील गोलानी येथे नवीन केंद्रे प्रस्तावित आहेत.

दरम्यान, सरकारी SAMEER ॲप आणि खासगी AQI.in वेबसाइटवरील आकडेवारीतही फरक आढळून आला आहे. AQI.in नुसार, ३ नोव्हेंबर रोजी नायगाव पश्चिम येथे AQI १५४, नवघर येथे १५५ आणि विशाल नगर येथे १५४ नोंदवण्यात आला होता.

पूर्व वसईत मॅन्युअल मॉनिटरिंग स्टेशन उभारण्याची तयारी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी आनंद काठोळे यांनी सांगितले की, पूर्व वसईत मॅन्युअल मॉनिटरिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. या व्यवस्थेअंतर्गत कर्मचारी हवेचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवतील. त्यामुळे धूलिकण आणि प्रदूषक वायूंचे वास्तविक प्रमाण समजू शकणार आहे.

४० ते ४५ RMC प्लांटमधून प्रदूषण होत असल्याचा आरोप

दरम्यान, ४० ते ४५ RMC प्लांटमधून धूलिप्रदूषण होत असल्याचा आरोप करत भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

२ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपला अहवाल सादर करण्यासाठी वेळ मागितला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करत चार RMC प्लांटचे वीजजोडणी खंडित केली असून, नऊ प्लांटना सुधारणा करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.

याशिवाय मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धूळ नियंत्रणासाठी NHAI, महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि RTO यांनाही आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वसई-विरारमधील प्रदूषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर सर्वांत मोठा प्रश्न असा आहे की, ज्या भागांमध्ये प्रदूषणाचा धोका अधिक आहे, तेथे पुरेशी हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रे कधी उभारली जाणार? जेणेकरून हवेच्या गुणवत्तेची वास्तविक स्थिती समोर येऊ शकेल.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *