दिव्यांग बांधवांसोबत आमदार राजेंद्र गावित यांनी साजरी केली ‘गोड दिवाळी’; स्वयंरोजगारातून स्वावलंबी होण्याचे आवाहन!

Share:

‘दिव्यांगांची गोड दिवाळी’ उपक्रमातून जपले आपुलकीचे नाते; शासकीय योजनांचा लाभ घेण्याचेही केले आवाहन

पालघर : “मी माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण, मग तो जन्मदिवस असो किंवा दिवाळीसारखा सण, समाजातील वंचित, उपेक्षित आणि दिव्यांग बांधवांसोबत साजरे करण्याला प्राधान्य देतो. कारण त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्याकडून मिळणारे आशीर्वाद हेच मला समाजसेवेच्या कार्यासाठी नवी ऊर्जा देतात,” असे प्रतिपादन आमदार राजेंद्र गावित यांनी केले.

वंदे मातरम् अंध अपंग सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित ‘दिव्यांगांची गोड दिवाळी’ या विशेष कार्यक्रमात आमदार राजेंद्र गावित यांनी दिव्यांग बांधवांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी दिव्यांग महिला आणि बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी तसेच स्वयंरोजगाराच्या संधींबाबत चर्चा केली.

यावेळी बोलताना आमदार गावित म्हणाले की, शारीरिक व्यंग असले तरी दिव्यांग बांधव मानसिकदृष्ट्या आणि कर्तृत्वाने सक्षम आहेत. दिव्यांग महिला बचत गटांच्या माध्यमातून चपाती व्यवसाय, भोजन सेवा, खानावळ, अगरबत्ती निर्मिती अशा विविध स्वयंरोजगाराच्या उपक्रमांतून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. केवळ सहानुभूती न दाखवता त्यांना स्वावलंबी होण्यासाठी संधी आणि सहकार्य देणे आवश्यक आहे.

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुदायिक विवाहासारखे उपक्रम राबविणे तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

पालघर नगर परिषदेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीतून पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून देणे, तसेच दिव्यांग दाखले आणि हयातीचे दाखले मिळविण्यासंदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केले.

“दिव्यांग बांधवांना मी माझ्या कुटुंबाचा एक भाग मानतो. त्यांच्यासोबत सण साजरे करताना मिळणारा आनंद वेगळाच असतो. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी खरी संपत्ती आहे,” अशा भावना आमदार गावित यांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाला पालघरचे नगराध्यक्ष उत्तम घरत, माजी नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे, शहरप्रमुख जयेश आव्हाड, पालघर वैद्यकीय संघाचे डॉ. उमेश डुंपलवार, रोटरीचे सदस्य भूषण सावे, प्रमोद पाटील, जतिन कदम, वंदे मातरम् अंध अपंग संस्थेचे अध्यक्ष विनोद राऊत, डॉ. राजेंद्र चव्हाण, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच विरार येथील विवा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.

दिवाळीच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांसोबत आपुलकीचे नाते जपत त्यांना सन्मान, प्रोत्साहन आणि स्वावलंबनाची प्रेरणा देणारा हा उपक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *