कुडूस नाक्यावर कचरा पेटवल्याने धुराचे प्रचंड लोट; नागरिकांचा जीव गुदमरला!

Share:

दिवाळीच्या गर्दीत बाजारपेठ धुराने व्यापली; महिला, लहान मुले, व्यापारी आणि वाहनचालकांना त्रास

पालघर (वार्ताहर) : कुडूस नाका परिसरात घनकचरा साठवणूक केलेल्या ठिकाणी कचरा पेटवून दिल्याने संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरल्याची घटना दिवाळीच्या सणादरम्यान घडली. अचानक पसरलेल्या दाट धुरामुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दिवाळीचा सण असल्याने कुडूस नाका परिसरातील बाजारपेठेत संध्याकाळच्या वेळी खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. व्यापारी, ग्राहक, महिला, लहान मुले तसेच वाहनचालकांची परिसरात वर्दळ सुरू असतानाच कचरा पेटविण्यात आल्याने काही वेळातच संपूर्ण परिसर धुराने व्यापला.

दाट धुरामुळे नागरिकांना गुदमरल्यासारखे झाले, तर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे आरोग्य आणि पर्यावरणाला धोका

सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी अशा प्रकारे खेळ होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी तो उघड्यावर पेटवून देण्याचा प्रकार पर्यावरणासाठीही घातक ठरत आहे. कचरा जाळल्याने निर्माण होणाऱ्या विषारी धुराचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

या प्रकाराची संबंधित ग्रामपंचायत आणि प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कचरा पेटविणाऱ्यांचा शोध घ्यावा, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कुडूस परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *