एटीएम कार्डची अदलाबदल करून ५० हजारांची फसवणूक; आरोपीला मुंबईतून अटक |

Share:

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे बोईसर पोलिसांची कारवाई; ३८ हजार रुपये व वाहन जप्त

पालघर : एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये काढल्याच्या प्रकरणाचा बोईसर पोलिसांनी तपास लावला आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला मुंबईतील सांताक्रूझ परिसरातून अटक केली.

एटीएममध्ये कार्डची केली अदलाबदल

बोईसर परिसरातील एका बँकेच्या एटीएममध्ये ४ सप्टेंबर रोजी फिर्यादी पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीने हातचलाखीने फिर्यादीच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली.

यानंतर संबंधित व्यक्तीने फिर्यादीच्या खात्यातून एकूण ५० हजार रुपये काढल्याचे समोर आले. याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१८(४) अन्वये ५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलिसांचे तपास पथक तयार करण्यात आले. तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३९ वर्षीय अफसर अब्दुल गफ्फार खान याचा शोध लागला. त्याला मुंबईतील सांताक्रूझ परिसरातून १६ सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

३८ हजार रुपये आणि वाहन जप्त

पोलिसांच्या कारवाईदरम्यान फसवणुकीच्या रकमेपैकी ३८ हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनय मोरे करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

या कारवाईत पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव तसेच अधिकारी आणि अंमलदारांनी सहभाग घेतला.

सायबर पोलीस ठाण्याच्या पथकानेही या तपासात सहकार्य केले.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *