पालघर : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ उपचार आणि पोषणविषयक उपाययोजनांपुरते मर्यादित न राहता प्रत्येक कुपोषित बालकाच्या आरोग्याची प्रत्यक्ष जबाबदारी घेण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कुपोषित बालक दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासह ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सफाळे येथील ठाणेपाडा अंगणवाडीतील दत्तक घेतलेल्या हार्दिक निलेश परेड या बालकाच्या घरी भेट देऊन त्याच्या आरोग्य व पोषणस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
हार्दिकच्या आरोग्याची घेतली माहिती
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनोज रानडे यांनी अंगणवाडीतील बालकांसह उपस्थितांना मोदक देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी हार्दिकचे वजन आणि उंची तपासण्यात आली. त्याला नियमित पोषण आहार मिळतो का, वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते का तसेच जंतनाशक औषध दिले जाते का, याबाबत रानडे यांनी संबंधितांकडून माहिती घेतली.
बालकाच्या पोषणस्थितीत आवश्यक सुधारणा व्हावी यासाठी अंडी आणि दूध उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच हार्दिकच्या आरोग्याच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी दर महिन्याला भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत त्याच्या पोषणस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणावरही भर
बालकाच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सक्षम होणेही महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन मनोज रानडे यांनी हार्दिकच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी कुटुंबाकडे असलेली जमीन, भातशेती, पालेभाज्यांची लागवड तसेच उत्पन्नाची उपलब्ध साधने याबाबत माहिती घेतली.
कुटुंबाच्या परिस्थितीनुसार महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून घरघंटी, शिलाई मशीन, पोल्ट्री शेड, कुक्कुटपालन, पशुपालन यांसारख्या उपजीविकेच्या योजनांचा लाभ देता येईल का, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
कुटुंबाचे उत्पन्न वाढल्यास बालकाच्या पोषणाची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी घेता येईल, या उद्देशाने पात्र योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
धनश्रीच्या कुटुंबाचीही घेतली माहिती
यानंतर मनोज रानडे यांनी धनश्री पिंटू ठाकरे या कुपोषित बालिकेच्या घरीही भेट देऊन तिच्या आरोग्याची तसेच कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती घेतली.
कुपोषित बालकांच्या कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार विविध शासकीय योजनांशी जोडून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
पौष्टिक खाऊचे वाटप
हार्दिक आणि धनश्री यांच्यासाठी सुकामेवा तसेच इतर पौष्टिक खाऊ मनोज रानडे यांच्या माध्यमातून देण्यात आला.
अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) व्यंकटराव हुंडेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तनवीर शेख, संबंधित अंगणवाडीच्या मुख्य सेविका व पर्यवेक्षिका, ग्रामपंचायत अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

