डॉ. अॅड. निलेश राऊत यांचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांना निवेदन
पालघर : पालघर जिल्हा पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या समृद्ध असून जिल्ह्यातील शेकडो वर्षे जुनी देवस्थाने, मंदिरे आणि ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करून त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. अॅड. निलेश रमेश राऊत यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात डॉ. राऊत यांनी सहकाऱ्यांसमवेत पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पालघर जिल्ह्यातील विविध देवस्थाने, मंदिरे आणि धार्मिक स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्याबाबत खासदारांना निवेदन देण्यात आले.
डॉ. राऊत यांच्या माहितीनुसार, खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हा विषय आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात येईल, असे आश्वासन दिले.
विविध प्राचीन धार्मिक स्थळांचा समावेश करण्याची मागणी
निवेदनात दातिवरे येथील श्री सतवादेवी मंदिर व श्री राम मंदिर, कोरे येथील हरबादेवी व हनुमान मंदिर, एडवण येथील श्री आशापुरा, श्री महादेव व श्री राम मंदिर, चटाळे येथील श्री हनुमान मंदिर, उसरणी येथील शिवमंदिर यांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच अंबोडे येथील बुद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भगवानगड येथील पुरातन शिवमंदिर, वेडी येथील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व देवी मंदिर, विराथन बुद्रुक येथील श्री वाघोबा व गावदेव मंदिर, जलसार व सोनावे येथील साईबाबा मंदिरे यांचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.
याशिवाय शिरगाव येथील सप्तशृंगी मंदिर, सातपाटी येथील श्री राम मंदिर व दर्गा, माहीम येथील राम मंदिर, श्री महाकाली मंदिर व महिकावती मंदिर तसेच पालघर-नवली येथील पुरातन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, राम मंदिर आणि आंबामाता मंदिर यांसह जिल्ह्यातील अन्य धार्मिक स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.
धार्मिक पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा
या देवस्थाने आणि धार्मिक स्थळांना शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विशेष अनुदान मिळाल्यास परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि पर्यटनविषयक सोयी विकसित होण्यास मदत होईल. त्यातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक पर्यटन आणि रोजगाराच्या संधींनाही हातभार लागू शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या माहितीनुसार ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी स्वतंत्र योजना उपलब्ध असून, अशा योजनांमधून विविध विकासकामांना निधी देण्याची तरतूद आहे.
विविध मान्यवरांची उपस्थिती
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे वसई तालुका प्रमुख प्रथमेश बांदेकर, भाजपा जिल्हा पदाधिकारी भरत काळे, माजी सरपंच कांद्रेभुरे जगदीश पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरालाल लोखंडे, वैद्यकीय मदत कक्ष सफाळे विभाग प्रमुख प्रसाद कुडू आदी उपस्थित होते.

