खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
पालघर | दिनांक : १६ ऑक्टोबर २०२६
पालघर जिल्ह्यातील उर्वरित पाच तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करून संपूर्ण पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य शासनाने पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि तलासरी या तीन तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश केल्याबद्दल खासदार डॉ. सवरा यांनी शासनाचे आभार मानले. मात्र, वाडा, विक्रमगड, डहाणू, वसई आणि पालघर या उर्वरित पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही प्रतिकूल पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनियमित पावसाचा भातशेतीला फटका
यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमित वितरणामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे आगमन उशिरा झाल्याने भातपेरणीला विलंब झाला. जुलै महिन्यात काही काळ अतिवृष्टी झाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत अनेक भागांत पावसाने उघडीप दिली. याचा भातपिकांच्या वाढीवर तसेच दाणे भरण्याच्या अवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या मध्यापासून तापमानात वाढ झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून पिकांना पाण्याच्या ताणाचा सामना करावा लागत आहे. परिणामी, भातपिकांच्या उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे खासदार डॉ. सवरा यांनी निदर्शनास आणून दिले.
तालुकानिहाय पुनर्सर्वेक्षण करण्याची मागणी
केवळ एकूण पर्जन्यमानाची आकडेवारी विचारात न घेता प्रत्यक्ष पावसाचे वितरण, पिकांची सद्यस्थिती, जमिनीतील ओलावा आणि शेती उत्पादनावर झालेला परिणाम यांचा विचार करून तालुकानिहाय पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी खासदार डॉ. सवरा यांनी केली आहे.
वाडा, विक्रमगड, डहाणू, वसई आणि पालघर या उर्वरित पाच तालुक्यांतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन त्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि सवलती द्या
संपूर्ण पालघर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित निकषांनुसार आर्थिक मदत, आवश्यक सवलती आणि इतर शासकीय लाभ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नैसर्गिक संकटाच्या काळात पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेतीच्या नुकसानीचा विचार करून त्यांना योग्य मदत मिळावी आणि जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शासनाने संपूर्ण जिल्ह्याच्या परिस्थितीचा सर्वंकष विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ. सवरा यांनी केले आहे.

