वाघोबा खिंडीत संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घटना; वाहनाचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
पालघर, मनोर : पालघर-मनोर मार्गावरील वाघोबा खिंडीत गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सीएनजी इको वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
वाहनाला आग लागल्याची माहिती मिळताच पालघर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सीएनजी वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे सीएनजी वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीएनजी वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नियमित तपासणी करून घ्यावी. तसेच अधिकृत आणि प्रशिक्षित तंत्रज्ञांकडून योग्य देखभाल व दुरुस्ती करूनच वाहने चालवावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.

