३० प्रशिक्षणार्थींनी घेतला मोफत प्रशिक्षणाचा लाभ; स्वयंरोजगाराच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
बोईसर प्रतिनिधी : ग्रामीण भागातील महिलांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने पालघर येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) यांच्यामार्फत सरावली येथे ३१ दिवसीय ‘वस्त्रचित्र कला लघुउद्यमी’ या विषयावरील मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना वस्त्रचित्र कलेचे विविध प्रकार, आकर्षक डिझाइन्स तयार करणे, रंगसंगती, चित्रकलेची विविध तंत्रे तसेच या कलेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येईल, याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिराचा समारोप ३० ऑक्टोबर रोजी झाला. या उपक्रमाचा एकूण ३० प्रशिक्षणार्थींनी लाभ घेतला.
समारोप कार्यक्रमाला सरपंच आनंद धोडी, आरसेटी पालघरचे संचालक वैभव विधाते, आरसेटीचे फॅकल्टी दिनेश मांढरे, प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षिका सुलभा शिंदे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्या रेखा बागुल उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना प्रशिक्षणातून आत्मसात केलेल्या कौशल्यांचा उपयोग करून स्वतःचा लघुउद्योग सुरू करावा आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले.
या प्रशिक्षणामुळे ग्रामीण महिलांना नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, स्वतःचा व्यवसाय सुरू करून कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात भर घालण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागातील महिला तसेच बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) सातत्याने प्रयत्नशील आहे. विविध विषयांतील प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या महिला आणि युवक-युवतींनी आरसेटी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

