घराच्या अंगणात उभ्या वाहनाला लक्ष्य; सीसीटीव्हीत संशयित वाहन कैद झाल्याची माहिती
पालघर / मनोर : वाडा तालुक्यातील मेट घोणसई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पत्रकार दिलीप पाटील यांच्या घराच्या अंगणात उभी असलेली थार गाडी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पत्रकार दिलीप पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांच्या जीवितालाही धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गावातील राजकीय घडामोडी तसेच नव्याने सुरू झालेल्या बांधकामाचा राग मनात धरून हा प्रकार घडविण्यात आल्याचा संशय पत्रकार दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विशेष म्हणजे, या घटनेतील एक संशयित वाहन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधितांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
पत्रकाराच्या घराच्या अंगणात घुसून वाहनाची तोडफोड करण्याचे धाडस करणाऱ्यांचा शोध घेऊन पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी त्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

