‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानासाठी जव्हारमध्ये एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न!

Share:

टाटा मोटर्स फाउंडेशन आणि बायफचा संयुक्त पुढाकार; लोकसहभागातून आरोग्यदायी गावनिर्मितीचा संकल्प

जव्हार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : टाटा मोटर्स फाउंडेशन आणि बायफ (BAIF) यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प २.० (IVDP 2.0) अंतर्गत ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या संकल्पनेवर आधारित लोकचळवळ व अभियानविषयक एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन ३ नोव्हेंबर रोजी बायफ कॅम्पस, जव्हार येथे करण्यात आले.

सकाळी १० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या कार्यशाळेत ग्रामीण भागातील आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लोकसहभागातून आरोग्यसंपन्न गाव निर्माण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेला प्राथमिक आरोग्य केंद्र साकूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चारूशांत सरफळे, प्राथमिक आरोग्य केंद्र जामसरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज वाडिले, तालुका आशा समन्वयक शैलेश बेडदे आणि प्रकल्प कार्यालयाचे मच्छीन्द्र गडाख यांची प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्यदायी गावनिर्मितीसाठी लोकसहभागावर भर

कार्यशाळेदरम्यान ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्या, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, आरोग्यदायी जीवनशैली, गावपातळीवरील जनजागृती तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून आरोग्यसंपन्न गाव घडविण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.

गावातील प्रत्येक कुटुंबाने आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून आरोग्याचा संदेश

कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद शाळा चौक आणि धानोशी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले आरोग्यविषयक पथनाट्य. या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण संदेश दिले.

विशेषतः गर्भवती महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रसूती नेहमी दवाखान्यातच करावी, हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या जनजागृतीपर सादरीकरणातून उपस्थितांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी बायफ संस्थेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रदीप खोसे, आरोग्य विषयतज्ज्ञ वैभव दातरंगे, आरोग्य समन्वयक कविता मोहिते, आश्लेषा देव, दलित मनवर आणि नचिकेत मेटकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र गांगोडा यांनी केले.

ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे, माता व बाल आरोग्याला प्राधान्य देणे, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजनांची माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविणे आणि लोकसहभागातून गावाला आरोग्यदायी बनविणे, या उद्देशाने आयोजित कार्यशाळेमुळे आरोग्यसंपन्न गावनिर्मितीच्या लोकचळवळीला दिशा मिळाली.

‘समृद्धीकडे प्रयत्नातून, समृद्ध गावाकडे…’ या ध्येयवाक्याला अनुसरून टाटा मोटर्स फाउंडेशन आणि बायफ यांच्या संयुक्त पुढाकारातून जव्हार तालुक्यात आरोग्यसंपन्न व समृद्ध गावनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *