गेलेली माणसं कधीच दूर जात नाहीत…! मांडे येथे पूर्वजांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीत अनोखी दिवाळी साजरी |

Share:

दिव्यांच्या रोषणाईत पूर्वजांच्या आठवणींना उजाळा; प्रेम, कृतज्ञता आणि नात्यांची जपणूक करणारा भावस्पर्शी उपक्रम

पालघर : दिवाळी म्हटली की घराघरांत दिव्यांची रोषणाई, आनंद, उत्साह आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. मात्र, सफाळे येथील मांडे गावात दिवाळी साजरी करण्याची एक आगळीवेगळी आणि मनाला स्पर्श करणारी परंपरा जपली जात आहे. आपल्या आयुष्यातून निघून गेलेली माणसे आठवणींतून कधीच दूर जात नाहीत, ती सदैव आपल्या सोबतच असतात, याची जाणीव करून देणारी अनोखी दिवाळी मांडे येथे साजरी करण्यात आली.

आपले आजी-आजोबा, आई-वडील आणि कुटुंबातील जिवाभावाची माणसे आज आपल्यात नसली, तरी त्यांच्या आठवणी, संस्कार आणि प्रेम आपल्या मनात कायम जिवंत असतात. ज्या माणसांनी आपल्याला जन्म दिला, घडवले आणि आयुष्याला दिशा दिली, त्या पूर्वजांनाही दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घ्यावे, या सुंदर भावनेतून मांडे येथील स्मशानभूमीत असंख्य दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच परिसरात आकर्षक सजावटही करण्यात आली.

सर्वसाधारणपणे पितृपक्षात आपण पूर्वजांचे स्मरण करतो. मात्र, दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही त्यांना विसरू नये आणि त्यांच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करावे, या भावनेतून हा अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला.

या उपक्रमातून एक सुंदर संदेश देण्यात आला की, माणसे शरीराने आपल्यातून निघून जातात; मात्र नात्यांनी, आठवणींनी आणि संस्कारांनी ती कधीच दूर जात नाहीत. आपल्या आनंदाच्या प्रत्येक क्षणात त्यांचाही वाटा असतो. मग दिवाळीच्या प्रकाशात त्यांची आठवण का नसावी?

सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांचा पुढाकार

या उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी रुपेश जाधव, सचिन जाधव, निलेश भोणे, मनोज मोहिते, प्रकाश जाधव आणि पत्रकार ऋषिकेश जाधव यांनी सहभाग घेतला.

स्मशानभूमीत दिव्यांची रोषणाई करून पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा उपक्रम केवळ दिवाळी साजरी करण्यापुरता मर्यादित नसून, प्रेम, कृतज्ञता, नात्यांची जपणूक आणि आपल्या मुळांशी असलेली नाळ जिवंत ठेवणारा ठरला.

कारण दिवाळीचा खरा प्रकाश केवळ घरातील दिव्यांमध्ये नसतो, तर आपल्या मनात जपलेल्या माणसांच्या आठवणींमध्येही असतो. गेलेली माणसे विसरायची नसतात, तर त्यांच्या आठवणींचाही आनंदाने सन्मान करायचा असतो. मांडे येथील हा अनोखा दीपोत्सव याच भावनेचा सुंदर आणि प्रेरणादायी प्रत्यय देणारा ठरला.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *