दिलीप वेंगसरकर अकादमीने पटकावले विजेतेपद; ग्लोरियस सी.सी. उपविजेता
मुंबई : महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) मार्गदर्शनाखाली डॅशिंग स्पोर्ट्स क्लब आणि अमर क्रिकेटर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॅशिंग कप महिला आमंत्रण क्रिकेट स्पर्धा २०२६-२७चा पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
स्पर्धेत दमदार कामगिरी करत दिलीप वेंगसरकर अकादमीने विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर ग्लोरियस सी.सी. संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. विजेता आणि उपविजेत्या संघांना पुरस्कार प्रदान करून त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले.
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देणाऱ्या प्रयत्नांचे कौतुक
या कार्यक्रमादरम्यान महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी विकास पाटील करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभाला MCAचे सचिव डॉ. उन्मेष खानविलकर, कोषाध्यक्ष अरमान मलिक, एपेक्स कौन्सिल सदस्य भूषण पाटील आणि विघ्नेश कदम यांच्यासह MCAशी संलग्न विविध क्रिकेट क्लबचे सचिव उपस्थित होते.
महिला क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक अनुभवाचे व्यासपीठ
समारंभात उपस्थित वक्त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे महिला क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. त्याचबरोबर त्यांना स्पर्धात्मक क्रिकेटचा महत्त्वपूर्ण अनुभवही मिळतो.
महिला क्रिकेटपटूंना समान संधी आणि दर्जेदार स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी MCAची कटिबद्धता कायम असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

