पूर्णेकर हत्याकांडाशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही : मीनाक्षी शिंदे |

Share:

राजकीय स्वार्थासाठी प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा आरोप

ठाणे, २ ऑक्टोबर : प्रदीप पूर्णेकर हत्याकांडावरून माजी महापौर आणि शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी स्वतःसह त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात येणारे आरोप फेटाळून लावले आहेत. या हत्येशी आपला किंवा आपल्या कुटुंबाचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपण शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठामपणे उभे असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळे राजकीय स्वार्थातून आपल्याला या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला.

पोलिसांच्या तपासाला सहकार्य करण्याची तयारी

ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले की, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. हा तपास निष्पक्षपणे पुढे जावा, अशी आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी स्वतःला किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला चौकशीसाठी बोलावल्यास तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिनबुडाचे आणि ठोस पुराव्याविना आपल्यावर तसेच आपल्या पतीवर आरोप केले जात असल्याचा दावा शिंदे यांनी केला. या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची पातळी खालावू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका

मीनाक्षी शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राजकीय फायद्यासाठी पूर्णेकर हत्याकांडाचा मुद्दा पुढे केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मृतकाच्या कुटुंबीयांच्या भावनांना चिथावणी देऊन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी म्हटले.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करताना मीनाक्षी शिंदे यांनी म्हटले की, अलीकडे ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे उपस्थित असतानाही राऊतच सातत्याने बोलत होते. यावर त्यांनी उपरोधिकपणे, “त्यांना रश्मी ठाकरे यांचे खासमखास मानायचे का?” असा सवाल केला.

पूर्णेकर कुटुंबीयांच्या भावनांचा विचार करण्याचे आवाहन

आपल्या प्रभागातील प्रत्येक व्यक्तीशी आपला वैयक्तिक संपर्क राहिला असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले. प्रदीप पूर्णेकर यांची हत्या दुर्दैवी असल्याचे सांगताना स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या घटनेचे आपल्यालाही दुःख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेला राजकीय रंग देऊन पूर्णेकर कुटुंबीयांना भडकवण्याचा आणि त्यातून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. असे प्रयत्न थांबवावेत आणि या प्रकरणात राजकारणाची पातळी खालावू नये, असे आवाहन मीनाक्षी शिंदे यांनी केले.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *