मूळ गावी २१ बंदुकीच्या फैरी झाडून पोलिसांकडून मानवंदना; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
मनोर : ठाणे शहरात कर्तव्य बजावत असताना झालेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक किशन भोईर यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलासह मनोर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्रीच्या गस्तीवर असताना पोलिसांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. त्यानंतर झालेल्या झटापटीत भोईर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजू वाल्मिकी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्तव्य बजावताना गंभीर दुखापत
उपलब्ध माहितीनुसार, PSI किशन भोईर हे रात्रीच्या वेळी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. यावेळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या मद्यविक्रीबाबत कारवाई करण्यासाठी पोलीस पथक संबंधित परिसरात गेले होते.
तेथे राजू वाल्मिकी याच्याशी पोलिसांचा वाद झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता धक्काबुक्की झाली. या घटनेत भोईर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी वाल्मिकी याला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पोलीस उपनिरीक्षक किशन भोईर यांना त्यांच्या मूळ गावी मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुकटन संख्ये पाडा येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आल्याची माहिती आहे.
शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून २१ बंदुकीच्या फैरी झाडून वीरमरण आलेल्या किशन भोईर यांना मानवंदना देण्यात आली.
कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
किशन भोईर यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या मूळ गावीही शोककळा पसरली आहे.
कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलीस अधिकाऱ्याला शासकीय इतमामात देण्यात आलेला अखेरचा निरोप भावनिक ठरला. त्यांच्या निधनाने पोलीस दलातील सहकारी, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

