नालासोपाऱ्यात प्रभाग समिती ‘ई’ कार्यालयात बैठक; प्रभाग क्रमांक ११ मधील तक्रारींवर कारवाई करण्याचे आदेश
नालासोपारा |
नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे वेळेत व प्रभावीपणे निराकरण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ई’ कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रभाग क्रमांक ११ मधील विविध नागरी समस्या, तक्रारी आणि सूचनांवर चर्चा करण्यात आली.
रुचिता अमित नाईक यांनी मांडल्या नागरिकांच्या समस्या
सामाजिक कार्यकर्त्या आणि बहुजन विकास आघाडीच्या रुचिता अमित नाईक यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या उपमहापौर मार्शल लोपीस यांच्यासमोर मांडल्या. तक्रारींची सविस्तर माहिती घेतल्यानंतर उपमहापौरांनी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुखांना समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
तक्रारींचा नियमित पाठपुरावा करण्यावर भर
नागरिकांच्या तक्रारी केवळ नोंदवून ठेऊ नयेत, तर त्यांचे निर्धारित कालमर्यादेत प्रभावी निराकरण करावे, असे उपमहापौर मार्शल लोपीस यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच संबंधित समस्यांचा नियमित पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा देण्यावर त्यांनी भर दिला.
महानगरपालिकेची कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि जबाबदार बनवणे तसेच नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.
बैठकीला अधिकारी आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती
या बैठकीला विद्यमान व माजी नगरसेवक, विविध पदाधिकारी, स्थानिक नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रभाग क्रमांक ११ मधील समस्या आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

