ग्रीनफिल्ड कॉरिडॉरच्या जमीन मोबदल्यासाठी पालघरमध्ये विशेष शिबिरे; ११ गावांचे वेळापत्रक जाहीर |

Share:

पालघर, : ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा मोबदला वितरित करण्यासाठी पालघर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून पात्र जमीनधारकांना मोबदला मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

यासंदर्भात पालघर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने परिपत्रक जारी केले असून, ११ गावांतील जमीनधारकांसाठी शिबिरांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही शिबिरे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहेत.

११ गावांतील शिबिरांचे वेळापत्रक

प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १७ ऑक्टोबर रोजी आककुळण, १९ ऑक्टोबर रोजी रावते, २१ ऑक्टोबर रोजी चिंचारे, २२ ऑक्टोबर रोजी गारगाव आणि २३ ऑक्टोबर रोजी आवंदे येथील जमीनधारकांसाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

तसेच, २४ आणि २६ ऑक्टोबर रोजी नानिवली, २७ ऑक्टोबर रोजी खुदात व आककुळी, २८ ऑक्टोबर रोजी शिरगाव, २९ ऑक्टोबर रोजी समशी, तर ३० ऑक्टोबर रोजी राणशेतगाव व नवाळे येथील जमीनधारकांसाठी शिबिरे होणार आहेत.

मोबदल्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करा

मोबदला वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जमीनधारकांनी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामध्ये आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत आणि आवश्यक प्रतिज्ञापत्र आदी कागदपत्रांचा समावेश आहे.

संबंधित जमीनधारकांनी निर्धारित तारखेला उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे प्रशासनाने सूचित केले आहे.

कागदपत्रांची पूर्तता वेळेत करण्याचे आवाहन

मोबदला वाटपासाठी आवश्यक कागदपत्रे सादर न करणाऱ्या जमीनधारकांच्या प्रकरणांची नोंद घेण्यात येणार असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे पात्र जमीनधारकांनी जाहीर वेळापत्रकानुसार उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करावीत आणि मोबदला मिळण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *