मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुर्घटना; यादव बोराडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू
पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील वरई येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकचा टायर अचानक निखळून झालेल्या या अपघातात महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक यादव बोराडे गंभीर जखमी झाले आहेत.
निखळलेला टायर समोरच्या ट्रकला धडकला

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या गुजरात वाहिनीवरून जाणाऱ्या एका ट्रकचा टायर अचानक निखळला. हा टायर समोरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला.
यानंतर निखळलेला टायर महामार्गालगत उभे असलेल्या महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक यादव बोराडे यांना जोरदार आदळला.
पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी
या दुर्घटनेत यादव बोराडे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
