नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची प्रेरणा
जव्हार प्रतिनिधी :
साखरे : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, साखरे (ता. विक्रमगड, जि. पालघर) येथे ‘सेवा संकल्प अभियाना’निमित्त ‘व्यसनमुक्त समाज जागरूकता’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने हा उपक्रम घेण्यात आला.
व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
यावेळी नशाबंदी मंडळाचे पालघर जिल्हा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज कमा कामडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीच्या आयुष्यावर तसेच कुटुंब आणि समाजावर होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम त्यांनी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, वाचन, संस्कार आणि सकारात्मक विचारांची जोपासना करावी तसेच आपले भविष्य उज्ज्वल घडवावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, आरोग्यदायी जीवनशैली आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिल्याबद्दल शासकीय आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक महेश गोविंद भोये आणि ज्येष्ठ शिक्षक अरविंद भोईर यांनी मनोज कामडी यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या सामाजिक प्रबोधन कार्याला शुभेच्छा दिल्या.
नशाबंदीची सामूहिक शपथ
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश लोहार यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांसह सर्वांनी नशाबंदीची सामूहिक शपथ घेतली. व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

