समाज कल्याण विभागाचा उपक्रम; अनुसूचित जाती, नवबौद्ध, ज्येष्ठ नागरिकांसह विविध वंचित घटकांसाठी ‘सेवा सेतू व समाधान शिबिरे’
पालघर, दि. २३ सप्टेंबर २०२६ : शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने पोहोचविण्यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने अनुसूचित जाती, नवबौद्ध, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर वंचित घटकांसाठी विविध कल्याणकारी शिबिरे आणि उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
योजनांचा लाभ नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यावर भर
सामान्य प्रशासन विभागाच्या ९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ त्यांच्या दारापर्यंत पोहोचविणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
तालुकास्तरावर ‘सेवा सेतू व समाधान शिबिरे’
अभियानांतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर ‘सेवा सेतू व समाधान शिबिरांचे’ आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज स्वीकारणे, आवश्यक मार्गदर्शन करणे तसेच पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्यावर भर दिला जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि वंचित घटकांसाठी प्रमाणपत्र वाटप, डिजिटल साक्षरता आणि आरोग्य तपासणी यांसारखे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. तसेच अनाथालये आणि वृद्धाश्रमांना भेटी देऊन तेथील गरजा जाणून घेऊन आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
विद्यार्थी व युवकांसाठी मार्गदर्शन
विद्यार्थी आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध शैक्षणिक प्रमाणपत्रांबाबत मार्गदर्शन, जात प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भातील माहिती, करिअर कौन्सिलिंग तसेच व्यसनमुक्तीविषयक जनजागृती उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
शिक्षण, रोजगार आणि कौशल्यविकासाच्या उपलब्ध संधींबाबत विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळावी, यासाठीही या अभियानातून प्रयत्न केले जाणार आहेत.
‘आशीर्वादाचा दिवा’ आणि ‘बदलाची गोष्ट’
शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अधिकारी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करणार आहेत. यासोबतच शासकीय योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांच्या प्रेरणादायी कथा ‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमातून संकलित करण्यात येणार आहेत.
पात्र नागरिकांनी शिबिरांचा लाभ घ्यावा
पालघर जिल्ह्यातील पात्र लाभार्थी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, वंचित घटक आणि सर्वसामान्य नागरिकांनी ‘सेवा संकल्प अभियान’ कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे यांनी केले आहे.

