तेलंगणात एमडी ड्रग्जसाठी लागणारे रसायन तयार करणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त; २५ आरोपींना अटक |

Share:

नालासोपाऱ्यातून सुरू झालेल्या तपासात गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणापर्यंत पसरलेल्या नेटवर्कचा पर्दाफाश; २७.०६ लाख रुपयांची रासायनिक पावडर आणि प्रयोगशाळेतील साहित्य जप्त

नालासोपारा/संगारेड्डी : मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाच्या अवैध व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-४ ने तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचे उत्पादन करणारा अवैध कारखाना उद्ध्वस्त केला. पोलिसांनी घटनास्थळावरून ४४.६९९ किलो रासायनिक पावडर जप्त केली असून तिची किंमत २७,०६,७४० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय अन्य रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्यही जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यात एमडी ड्रग्जसह पहिली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जून २०२६ रोजी रात्री नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर येथून मनवेल पाडा रोडजवळील बाबा पार्किंग परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी अविनाश उर्फ सोनू लोकनाथ अय्यर (वय २२) आणि रविकांत ओमप्रकाश राम (वय २३) यांना ११२ ग्रॅम मेफेड्रोनसह पकडण्यात आले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे ३.३६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी २५ जून २०२६ रोजी तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-४ कडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील सांधाण गाव आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मेजा परिसरात एमडी तयार करणारे अवैध कारखानेही शोधून काढत उद्ध्वस्त केले.

६९ किलोहून अधिक एमडी आणि २६० लिटर रसायन जप्त

तपासादरम्यान आतापर्यंत एकूण ६९ किलो ८७१ ग्रॅम एमडी ड्रग्ज, रोख रक्कम, एमडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी २६० लिटर रसायने आणि प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणात पुढील कारवाई करत पोलिसांनी महाराष्ट्र, मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेशासह विविध भागांतून अन्य आरोपींनाही अटक केली.

तेलंगणातील रसायननिर्मिती कारखान्यावर छापा

तपासात असे समोर आले की, अटक करण्यात आलेल्या काही आरोपींना एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरले जाणारे नियंत्रित रसायन 2-Bromo-4-Methylpropiophenone पुरवले जात होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रमेश बाबू साके हा तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पाशमैलाराम औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात या रसायनाचे कथितरीत्या अवैध उत्पादन करत होता.

या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-४ च्या पथकाने २१ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित कारखान्यावर छापा टाकून रमेश बाबू साके याला ताब्यात घेतले. या कारवाईत रासायनिक पावडरसोबत अन्य रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्यही जप्त करण्यात आले.

या मोहिमेत सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील पाटनचेरू पोलीस ठाण्याच्या पथकाने सहकार्य केले.

अनेक राज्यांत पसरलेल्या नेटवर्कचा तपास सुरू

पोलिसांच्या माहितीनुसार, एमडी ड्रग्ज आणि त्याच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे उत्पादन, रसायने व प्रयोगशाळेतील साहित्याचा पुरवठा, अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये कथितरीत्या सहभागी असलेल्या एकूण २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नालासोपारा, मुंबई, कल्याण, नेरळ, जळगाव, गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या भागांपर्यंत पसरलेल्या नेटवर्कच्या तपासाचा हा एक भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण भोसले यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *