गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची वसई-विरारचे महापौर अजीव पाटील यांनी घेतली भेट; कचरा व्यवस्थापनावर चर्चा |

Share:

वसई-विरार : वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ गोव्याच्या तीन दिवसीय कचरा व्यवस्थापन अभ्यास दौऱ्यावर आहे. शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी महापौर अजीव पाटील आणि शिष्टमंडळाने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान घनकचरा व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

१३२ हून अधिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग

या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते मनोज पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, गटनेते अशोक शेळके, नगर सचिव विश्वनाथ तलेकर यांच्यासह १३२ हून अधिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत.

कचरा व्यवस्थापनासाठी गोव्याचे मार्गदर्शन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील कचरा संकलन, सुरक्षित वाहतूक, ई-कचरा आणि जैववैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. तसेच, या व्यवस्थांचा वसई-विरारमध्ये अवलंब करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यापूर्वी शिष्टमंडळाने प्रशिक्षण कार्यशाळेत ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, बायोगॅस निर्मिती तसेच आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धतींची माहिती घेतली. शिष्टमंडळातील सदस्यांनी उत्तर गोव्यातील नॉर्थ गोवा कचरा प्रक्रिया केंद्रालाही भेट दिली.

वसई कला-क्रीडा महोत्सव आणि महापौर मॅरेथॉनचे निमंत्रण

महापौर अजीव पाटील यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना वसई कला-क्रीडा महोत्सव आणि महापौर मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

या अभ्यास दौऱ्यामुळे वसई-विरारमधील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन व्यवस्था अधिक प्रभावी करण्यास मदत होईल, असा विश्वास महापौर अजीव पाटील यांनी व्यक्त केला.


Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *