जव्हार तहसील कार्यालयात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ रक्तदान शिबिर |

Share:

अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ४१ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘रक्तदान करा, मानवता जपा’चा संदेश

जव्हार प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जव्हार तहसील कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पतंगशाह कुटीर रुग्णालय रक्तपेढी आणि तहसीलदार कार्यालय, जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा व उपक्रम पोहोचविण्यासोबतच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून लोकहिताचे उपक्रम राबविणे हा या अभियानाचा उद्देश आहे. याच अनुषंगाने जव्हार तहसील कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

या शिबिरास सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार, तहसीलदार लता धोत्रे, नायब तहसीलदार सुरेश कामडी आणि नायब तहसीलदार दत्ता बोरसे यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पतंगशाह कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन महाले यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाने रक्त संकलनाची प्रक्रिया पूर्ण केली.

तहसील कार्यालयासह गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच इतर नागरिकांनी रक्तदान करून शिबिराला प्रतिसाद दिला.

रक्तदानाचे महत्त्व पटवून देत जनजागृती

यावेळी मेडिकल सोशल वर्कर निलेश घनश्याम रावळ यांनी रक्तदात्यांना रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले. रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्याने अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, कर्करोगग्रस्त तसेच थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करत त्यांनी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

“रक्तदान हे जीवनदान असून, आपल्या एका छोट्याशा प्रयत्नामुळे गरजू रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते. रक्तदानाबाबतचे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करून सामाजिक जबाबदारी म्हणून नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

४१ रक्तदात्यांचा सहभाग

अपघात, प्रसूती, शस्त्रक्रिया, कर्करोग आणि थॅलेसेमिया यांसारख्या परिस्थितींमध्ये रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तदानाची चळवळ व्यापक करण्याचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

शिबिरात एकूण ४१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. के. सिद्धार्थ रामकुमार आणि तहसीलदार लता धोत्रे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमातून ‘रक्तदान करा – मानवता जपा’ हा संदेश देण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचा प्रयत्न जव्हार तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आला.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *