रुग्णालयांतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालघर पोलिसांची स्वतंत्र हेल्पलाईन |

Share:

हल्ला, धमकी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ८४६८८५०७७१ क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअॅप संदेश; सर्व पोलीस ठाण्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी

पालघर : जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये कार्यरत डॉक्टर, परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेत पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी रुग्णालयांसाठी स्वतंत्र पोलीस हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.

रुग्णालयात डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संबंधित मारहाण, धमकी, तोडफोड किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ८४६८८५०७७१ या क्रमांकावर दूरध्वनी किंवा व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे माहिती देता येणार आहे. माहिती प्राप्त होताच आवश्यक कायदेशीर तसेच प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोलिसांशी संपर्क

डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा देताना सुरक्षित वातावरण मिळावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी तातडीने संपर्क साधता यावा, या उद्देशाने स्वतंत्र संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, दवाखाने, नर्सिंग होम तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांपर्यंत हा हेल्पलाईन क्रमांक पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रुग्णालय प्रशासनालाही थेट संपर्काची सुविधा

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, प्रमुख डॉक्टर तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी या हेल्पलाईन सेवेची माहिती घेऊन ती रुग्णालयातील संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

रुग्णालयात डॉक्टरांशी संबंधित मारहाण, धमकी, गोंधळ किंवा अन्य कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास विलंब न करता हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णालयाच्या दर्शनी भागात हेल्पलाईन क्रमांक लावण्याचे निर्देश

८४६८८५०७७१ हा हेल्पलाईन क्रमांक रुग्णालयातील आपत्कालीन विभाग, स्वागत कक्ष, डॉक्टर कक्ष आणि सुरक्षा कक्ष अशा ठिकाणी सहज दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करण्याची सूचना करण्यात आली आहे.

तसेच संबंधित बीट अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांशी आवश्यक समन्वय ठेवावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

हेल्पलाईनवरून माहिती प्राप्त झालेल्या रुग्णालयांची तसेच त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची नोंद पोलीस ठाणे स्तरावर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. केलेल्या कार्यवाहीचा संक्षिप्त अहवाल आणि संपर्क साधलेल्या रुग्णालयांची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर

डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेशी संबंधित घटना घडण्यापूर्वीच संभाव्य धोका ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता याव्यात, हा या व्यवस्थेमागील महत्त्वाचा उद्देश आहे.

हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार तातडीची पोलीस मदत उपलब्ध करून देण्यासोबतच कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

चौकट : वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदेशीर संरक्षण

महाराष्ट्रात वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्थांना हिंसाचार तसेच मालमत्तेचे नुकसान यापासून संरक्षण देण्यासाठी ‘The Maharashtra Medicare Service Persons and Medicare Service Institutions (Prevention of Violence and Damage or Loss to Property) Act, 2010’ हा स्वतंत्र कायदा लागू आहे. या कायद्यात वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्ती व संस्थांविरुद्ध हिंसाचारास प्रतिबंध आणि नुकसान झाल्यास संबंधित तरतुदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालघरमध्ये सप्टेंबर २०२६ मध्ये रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील कथित हल्ल्याच्या प्रकरणानंतर या विषयावर न्यायालयीन पातळीवरही सुनावणी झाली असून, बॉम्बे हायकोर्टाने तपासाबाबत पालघर पोलिसांकडून स्पष्टीकरण मागितले होते.

Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *