मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणी
मनोर, दि. २७ सप्टेंबर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत पालघर तालुक्यातील दुर्वेस गावातील चाचू पाडा परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पट्टेरी वाघ दिसल्याची कोणतीही अधिकृत माहिती वनविभागाला मिळालेली नसून समाजमाध्यमांवरील माहिती अफवा असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
समाजमाध्यमांवर प्रसारित संदेशांमध्ये दुर्वेस गावातील चाचू पाडा हद्दीतील वळण परिसरात पट्टेरी वाघ दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करणारे संदेशही प्रसारित झाले. शेतीच्या कामासाठी किंवा जंगल परिसरात जाताना काळजी घ्यावी, रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या.
वनविभागाकडून अफवा असल्याचे स्पष्टीकरण
या प्रकरणाबाबत दहिसर वनपरीक्षेत्राचे वनक्षेत्रपाल हृषीकेश वाघमारे यांनी माहिती देताना पट्टेरी वाघ दिसल्याची कोणतीही अधिकृत माहिती वनविभागाला प्राप्त झालेली नसल्याचे सांगितले. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली माहिती अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पालघर जिल्ह्यातील जंगलांमध्ये पट्टेरी वाघाचे वास्तव्य नसल्याचे सांगत परिसरात प्रामुख्याने बिबट्यांचा वावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
घटनास्थळाची पाहणी करणार
समाजमाध्यमांवरील माहितीनंतर वनविभागाकडून दुर्वेस येथील संबंधित ठिकाणाची पाहणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रत्यक्षात कोणताही वन्यप्राणी आढळल्यास स्वतःहून त्याच्या जवळ जाण्याऐवजी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या दुर्वेस परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या हालचालींची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांच्या वावराबाबत सतर्कता वाढली असून, वनविभागाच्या पाहणीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

