बालकांचे आरोग्य, पोषण आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत पालकांमध्ये जनजागृती
मनोर : केंद्र शासनाच्या ‘पोषण भी पढाई भी’ तसेच पोषण अभियानांतर्गत सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोर विभागातील टाकवली-गावठण अंगणवाडी केंद्रात पोषण आणि बालविकासविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात लहान मुलांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. बालकांच्या शारीरिक वाढीसोबतच मानसिक, बौद्धिक आणि भाषिक विकासासाठी सकस व पोषक आहार तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.
अंगणवाडीतील बालकांसाठी विविध शैक्षणिक आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बालकांना सकस व संतुलित आहार देणे, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावणे तसेच त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच सदानंद गणेशकर, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षिका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
पोषण अभियानाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक बालक निरोगी, सुदृढ आणि शिक्षणासाठी सक्षम व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी विशेष परिश्रम घेतले.

