मनोर : प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या प्रयत्नात ६० फूट उंच सुरूच्या झाडावर चढलेल्या अल्पवयीन तरुणाचे प्राण डहाणू पोलिसांच्या समयसूचकतेमुळे वाचले. मंगळवारी दुपारी पारनाका येथील सुरूच्या बागेत ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने स्वतः पालघर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आपण झाडावर चढल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुर शेलार आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी
झाडाची उंची सुमारे ६० फूट असल्याने तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. खबरदारीचा उपाय म्हणून डहाणू नगरपरिषदेचे अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिकेलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
तासभर संवाद साधत तरुणाची समजूत
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एपीआय अंकुर शेलार यांनी तरुणाशी फोनवरून संयमाने आणि आपुलकीने संवाद साधण्यास सुरुवात केली. सुमारे तासभर संवाद साधत त्याची समजूत काढण्यात आली. पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि तरुणाने टोकाचा निर्णय मागे घेत सुरक्षितपणे झाडावरून खाली उतरला.
यानंतर पोलिसांनी तरुणाला त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले. डहाणू पोलिसांच्या तत्परता, संयम आणि समयसूचक हस्तक्षेपाचे कौतुक होत आहे.
पत्रकार :

