दुर्वेस नाका येथे दुर्दैवी घटना; छातीत कात्री घुसल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू |

Share:

जिन्यावर चक्कर येऊन तोल गेल्याने घडला अपघात; रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले

मनोर | दिनांक १९ : पालघर तालुक्यातील दुर्वेस नाका परिसरात कपडे कापण्याच्या कामासाठी घराच्या पहिल्या मजल्यावर जात असताना अचानक चक्कर येऊन तोल गेल्याने हातातील लोखंडी कात्री छातीत घुसून एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नरेश मोहनलाल प्रजापती असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (दि. १९) दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जिन्यावर चक्कर आल्याने घडला अपघात

नरेश मोहनलाल प्रजापती हे पालघर तालुक्यातील दुर्वेस नाका येथील गणपती मंदिरासमोरील परिसरात राहत होते. सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर ते कपडे कापण्याच्या कामासाठी घराच्या पहिल्या मजल्यावर जात होते. त्यावेळी त्यांच्या डाव्या हातात लोखंडी कात्री होती.

घरातील जिन्यावरून वर जात असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते पुढील बाजूला पडले. या अपघातात त्यांच्या हातातील लोखंडी कात्री छातीच्या भागात घुसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. छातीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाले.

रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित

घटनेनंतर नरेश यांना तातडीने उपचारासाठी मनोर येथील आस्था रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

मृत्यूबाबत संशय नसल्याची नोंद

या घटनेबाबत कुसुम प्रजापती यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिन्यावर चक्कर येऊन तोल गेल्यामुळे हा प्रकार घडला. नरेश यांच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचे तसेच कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.


Share:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *