अवजड वाहतुकीमुळे पुलाच्या संरचनेवर ताण; दुर्घटनेपूर्वी दुरुस्ती आणि स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
मनोर : पालघर तालुक्यातील वरई–सफाळे मार्गावरील पारगाव हद्दीतील वैतरणा खाडीवरील पुलाची दुरवस्था झाल्याने पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, एक्सपान्शन जॉईंटजवळील सिमेंट काँक्रीट उखडल्याने लोखंडी सळ्या धोकादायकरीत्या बाहेर आल्या आहेत. या परिस्थितीमुळे वाहनचालक, प्रवासी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा मार्ग
वरई–पारगाव–सफाळे मार्ग हा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. वरई, दहिसर, साखरे, नावझे, गिराळे, सोनावे, पारगाव तसेच दारशेत परिसरातील विद्यार्थी, कामगार, नोकरदार, व्यापारी आणि नागरिक सफाळे रेल्वे स्थानक तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.
बुलेट ट्रेनच्या कामामुळे अवजड वाहतूक वाढली
सध्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी रेडिमिक्स काँक्रीट वाहून नेणारे मिक्सर तसेच माती, दगड आणि इतर साहित्य वाहून नेणारे अवजड व ओव्हरलोड डम्पर या मार्गावरून मोठ्या प्रमाणात धावत आहेत.
यापूर्वी मुंबई–वडोदरा एक्स्प्रेस वेच्या कामासाठीही या मार्गावरून सातत्याने अवजड वाहतूक सुरू होती. या सततच्या अवजड वाहतुकीमुळे पुलाच्या रस्त्याबरोबरच पुलाच्या संरचनेवरही अतिरिक्त ताण पडत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात खड्ड्यांचा धोका वाढला
पावसाळ्यात पुलावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही. त्यातच एक्सपान्शन जॉईंट उखडून लोखंडी सळ्या बाहेर आल्याने दुचाकीस्वार आणि लहान वाहनचालकांसाठी हा भाग अधिक धोकादायक बनला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यापूर्वीही पिलर कलंडल्याची घटना
पारगाव पुलाच्या सुरक्षिततेबाबत यापूर्वीही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. काही वर्षांपूर्वी पुलाचा पिलर कलंडल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी पुलावरील अवजड वाहतूक वर्षभरापेक्षा अधिक काळ बंद ठेवण्यात आली होती.
त्यामुळे सध्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात पुन्हा वाहतूक ठप्प होण्याबरोबरच मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी
शनिवारी पुलावरील काँक्रीट उखडून लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे निदर्शनास आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पुलाची सद्यस्थिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
खड्डे बुजविण्यासह स्ट्रक्चरल ऑडिट
पुलावरील खड्डे तातडीने बुजवून आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या तपासणीत पुलाची संरचनात्मक क्षमता, काँक्रीटची गुणवत्ता, एक्सपान्शन जॉईंटची स्थिती तसेच अवजड वाहतुकीमुळे पुलावर झालेल्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
दुर्घटनेपूर्वी ठोस उपाययोजनांची मागणी
पुलाची प्रत्यक्ष स्थिती अधिक गंभीर होण्याची वाट न पाहता तातडीने दुरुस्ती करावी, अवजड वाहतुकीवर आवश्यक नियंत्रण आणावे आणि पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानुसार ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी, वाहनचालक आणि परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

